काटोल नगर परिषद: फास्टफूड विक्रेत्यांवर कारवाईपेक्षा 'हायजीन' प्रशिक्षण आणि चौपाटीवर मूलभूत सुविधा देण्याची मागणी

काटोल शहर नगर परिषदेच्या आरोग्य विभागाने शहरात एक विशेष आणि तीव्र मोहीम राबवत ५० हून अधिक पाणीपुरी, नूडल्स, मोमोज, भेळ आणि कचोरी विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई केली आहे. या धडक कारवाईमुळे शहरातील लहान व्यापाऱ्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. ​सध्या शहरात बीएसएनएल कार्यालयासमोर, ऑरेंज प्लाझा, बस स्थानक परिसर, पोस्ट ऑफिस परिसर, गळपुरा यांसारख्या विविध भागांत १५० हून अधिक फास्टफूड विक्रेते व्यवसाय करतात. आरोग्य विभागाच्या पाहणीदरम्यान अनेक विक्रेत्यांकडे हातमोजे (ग्लोव्हज), कॅप, मास्क आणि ॲप्रनसारख्या साधनांचा अभाव आढळला, तसेच हातगाड्यांच्या आजूबाजूला अस्वच्छता दिसून आली. या अनियमिततेची दखल घेत नगर परिषदेने ५० हून अधिक विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करत अन्न सुरक्षा आणि वैयक्तिक सुरक्षेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे सक्त निर्देश दिले आहेत. ​प्रशिक्षणातून मार्ग काढण्याची गरज ​दरम्यान, या कारवाईनंतर स्थानिक पातळीवर वेगळा विचारप्रवाह समोर येत आहे. लहान व्यावसायिकांवर थेट दंडात्मक कारवाई करण्याऐवजी, नगर परिषदेच्या वतीने या विक्रेत्यांना व त्यांच्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्वच्छता आणि आरोग्यदायी पद्धतींचे योग्य प्रशिक्षण दिले, तर तो अधिक उत्तम पर्याय ठरेल, असे मत व्यक्त केले जात आहे. लहान व्यापारी आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर स्वच्छता व आरोग्याबाबत दंडात्मक कारवाई करण्याऐवजी, या व्यवसायांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 'हायजीन' (स्वच्छतेच्या पद्धतींचे) योग्य प्रशिक्षण द्यावे; तसेच काटोल नगर परिषदेने चौपाटीच्या ठिकाणी फ्लोअरिंग (पक्के फर्शिंग), पाणी आणि विजेची (प्रकाश) योग्य व्यवस्था करून द्यावी. ​प्रशिक्षणामुळे कमी भांडवलात सुरक्षित रोजगाराच्या नवीन शक्यता निर्माण होतील आणि स्वयंरोजगाराला मोठा दिलासा मिळेल. परिणामी, स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी वाढून सरकारसमोरील बेरोजगारीच्या समस्येचा ताण कमी होण्यासही मदत होईल, असा सूर आता उमटू लागला आहे.नगर परिषद काटोलने आपल्या नावाप्रमाणेच लहान व्यापारी आणि जनतेशी आर्थिकदृष्ट्या सहकार्याची व समन्वयाची भूमिका घ्यावी; केवळ कर वसुली करणारी संस्था बनू नये. नेत्यांनी हे विसरू नये की, याच लहान-लहान व्यापाऱ्यांच्या आणि मध्यमवर्गीय जनतेच्या पाठिंब्यामुळे निवडणूक जिंकून त्यांना यश मिळते.

1 / 1

1.